ठाणे जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपासून ‘डीप क्लीन ड्राइव्ह’; स्वच्छता, सुशोभीकरण आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; रस्ते स्वच्छता, अनधिकृत होर्डिंग्ज आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाईच्या सूचना

 




 

ठाणे,दि.26 (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा नियोजन भवन येथे बैठक पार पडली.

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “ठाणे जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या डीप क्लीन ड्राइव्हच्या माध्यमातून रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात यावे. अनधिकृत होर्डिंग्ज, अतिक्रमणे आणि नियमबाह्य कामांवर कठोर कारवाई करावी. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच स्वच्छतेच्या कामात सातत्य आणि गुणवत्ता राखण्यावर भर द्यावा.”

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती शहरांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. प्रत्येक रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून त्यासाठी नोडल अधिकारी नेमावेत. स्वच्छतेच्या कामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करावा. सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा, मेडिक्लेम आणि आर्थिक पाठबळ देण्यास प्राधान्य द्यावे. नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्या सहभागातून स्वच्छ व सुंदर शहरांची निर्मिती करावी.”

या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे,  जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रणजीत यादव, अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासह संबंधित महानगरपालिका व नगरपरिषदांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये 30 नोव्हेंबरपासून ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ राबविण्यात येणार असून, या मोहिमेच्या माध्यमातून रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, नाले आणि परिसराची व्यापक स्वच्छता करण्यात येणार आहे. रस्त्यांची नियमित स्वच्छता, पदपथांची दुरुस्ती, रोड मार्किंग, रंगरंगोटी, सुशोभीकरण तसेच कचरा संकलनासाठी योग्य ठिकाणी कचरापेट्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाच्या आधारे आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

बैठकीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वच्छतेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रत्येक रस्त्याच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेसीबी, टिपर, मेकॅनिकल स्वीपर, सफाई कर्मचारी आणि बिन वॉशर यांसारख्या यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करून स्वच्छता मोहिमेला गती देण्यावर भर देण्यात आला. बांधकाम विभागाच्या सहभागातून रस्त्यांचे मार्किंग, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, कचरा संकलनासाठी निश्चित ठिकाणे ठरवावीत आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावीत, अशा सूचनाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. स्वच्छता मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण निर्मूलन, कचरा व बांधकामाचा मलबा उचलणे, नालेसफाई, यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छता, पाण्याद्वारे स्वच्छता आणि शहर सुशोभीकरण यांचा आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या बांधकामांमधील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी साचलेला कचरा हटविणे, पदपथ सुस्थितीत ठेवणे तसेच अनधिकृत नळजोडण्यांची तपासणी करून त्यावर एका आठवड्यात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा व्यवस्थेत वॉटर मीटरिंगची अंमलबजावणी करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. पाणीपट्टीच्या थकबाकीबाबतही चर्चा करण्यात आली.

शहरांमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. होर्डिंग्ज उभारण्यासाठी नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक असून, परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर कारवाई करावी. तसेच अस्तित्वातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. मेट्रो मार्गिका 12 चे काम, डबल डेकर उड्डाणपुलाची संकल्पना आणि आधुनिक रस्ते विकसित करण्याच्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करणे, रस्त्यांचे नियोजनबद्ध सुशोभीकरण करणे आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील स्वच्छता आणि विकासकामांचा आढावा घेताना कल्याण-शिळफाटा मार्गावरील कामांचे नियोजन, सामाजिक संस्थांचा सहभाग आणि स्वच्छतेसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच एमआयडीसी क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी दिली.

या बैठकीत संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद आणि विभागांच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. डीप क्लीन ड्राइव्ह प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करून कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

0000000000

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती