शिष्यवृत्ती अर्जासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ; 100 टक्के अर्ज भरण्याचे आवाहन कमी अर्ज भरणाऱ्या शाळा-महाविद्यालयांच्या प्राचार्यांना द्यावा लागणार खुलासा; दर शुक्रवारी आढावा
ठाणे,दि.27(जिमका) :- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) मार्फत
राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील ऑनलाइन अर्ज सादर करण्यास ३१
जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी
शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC)
तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के
अर्ज विहित मुदतीत भरून घ्यावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे
यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकही पात्र
विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विभागाने सर्व शाळा
व महाविद्यालयांना विशेष निर्देश दिले आहेत. शैक्षणिक संस्थांनी शिष्यवृत्तीसाठी
पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांची नेमकी संख्या निश्चित करावी.
अद्याप अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची
पूर्तता करून त्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी.
शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या
कामकाजावर विभागाकडून नियमित नियंत्रण ठेवण्यात येणार असून, दर आठवड्याच्या
शुक्रवारी सर्व शाळा व महाविद्यालयांचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यात पात्र
विद्यार्थ्यांच्या तुलनेत सर्वात कमी अर्ज भरलेल्या संस्थांच्या प्राचार्य व
मुख्याध्यापकांना लेखी खुलासा मागविण्यात येणार असून, त्यांना कार्यालयात समक्ष
उपस्थित राहून स्पष्टीकरणही द्यावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांचे आधार
क्रमांक, बँक खाते तपशील, आधार सीडिंग व इतर आवश्यक कागदपत्रांची काटेकोर पडताळणी
करून अर्ज अचूक भरावेत. या कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा
खपवून घेतला जाणार नाही. पात्र विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्ज भरले जातील, याची
संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांची
राहणार आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांनी 31 जानेवारी 2027
पूर्वी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत
सहकार्य करावे. या योजनेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुक विद्यार्थी,
पालक व संस्थांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे कार्यालयाशी संपर्क साधावा,
असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे यांनी
प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
00000000000
Comments
Post a Comment