अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या वाहतुकीवर मोठी कारवाई, 94.78 लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे,दि.27(जिमाका) :- अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे
आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त (दक्षता) श्रीमती टिपरे आणि सह आयुक्त (कोकण विभाग)
डॉ. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त गुप्त माहितीच्या अनुषंगाने दिनांक
26 नोव्हेंबर 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाचे गस्त घालून पाळत ठेवण्यात आली होती.
TG 12 U 1611 या क्रमांकाच्या आयशर कंटेनरमधून प्रतिबंधित अन्न पदार्थांची मुंब्रा
दिशेकडून भिवंडीकडे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून, पोलिसांच्या मदतीने सदर
वाहन ठाणे झोन 9 अंतर्गत अमित गार्डन सर्कल, कळवा, जि. ठाणे येथे थांबवून तपासणी करण्यात
आली.
सदर कारवाई
सहाय्यक आयुक्त (अन्न), ठाणे झोन 09 पी. ए.
विशे, अन्न सुरक्षा अधिकारी ए. जे. वीरकायदे,
अन्न सुरक्षा अधिकारी एस. एल. जाधवर यांनी दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यु.
एस. बडे, तसेच कळवा पोलीस ठाण्याचे API संतोष पिंपळे, Head constable निखील जाधव व
उदय कोरे, Police Constable नामदेव कोळी यांच्या संयुक्त पथकासह केली.
तपासणीदरम्यान
सदरच्या आयशर कंटेनरमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या गोण्यांच्या मागील व पुढील
बाजूस दिशाभूल अथवा फसवणूक करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक टेवल पंखे (29 बॉक्स),
सिलिंग फॅन (8 बॉक्स), जेवणाचे डब्याचे वॉक्स (5 बॉक्स), लाईफ सेव्हिंग मेडिसिन (1
बॉक्स) व इतर साहित्य ठेवून त्याआड छुप्या पद्धतीने वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून
आले. सदर वाहनातून रुपये 66,78,000/- किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ आणि रुपये 28,00,000/-
किमतीचे वाहन असा एकूण रुपये 94,78,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी
कळवा पोलीस ठाणे येथे दिनांक 26/11/2026 रोजी या गुन्ह्यामध्ये (1) मेहराज करीम शेख
(वाहन क्र. TG 12 U 1611 चा चालक, अमित गार्डन, कळवा, जि. ठाणे), (2) बाबू मिया मुजावर
(उत्पादक), (3) राजू (वाहतूकदार), (4) माल सुपूर्द करावयाचा असलेला अज्ञात आरोपी,
(5) सावन भाटेवार (उत्पादक), (6) विकास गुप्ता (वितरक, साकीनाका), (7) जावेद (वितरक,
गोवंडी) आणि (8) गुल्लू (वितरक, भिवंडी) यांच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल (FIR) क्रमांक
743/2026 दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध
प्रशासनाकडून अशा प्रकारच्या धाड सत्रांची मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
प्रतिबंधित अन्न पदार्थांविषयी व अन्न भेसळी विषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ
प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जनतेस कळविण्यात
येते की, प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या 100% अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य
करावे. कोणतीही तक्रार किंवा माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क
करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन (म. रा.) कोकण विभाग सह आयुक्त (कोकण विभाग) डॉ.
सचिन जाधव यांनी केले आहे.
00000000000

Comments
Post a Comment