उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संविधानाच्या मराठी व इंग्रजी पुस्तिकांचे वितरण संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन; संविधान प्रत वितरणाचा शुभारंभ
ठाणे,दि.26(जिमाका)
: भारतीय संविधानाने देशाला
दिलेली लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची तत्त्वे समाजाच्या
प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने संविधान दिनानिमित्त आज,दि. २६ नोव्हेंबर
२०२६ रोजी ठाणे येथील नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावर संविधान पुस्तिका वितरण कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते भारताच्या संविधानाच्या
मराठी आणि इंग्रजी आवृत्तीच्या पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी संविधान प्रत
वितरण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाची
सुरुवात संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. उपस्थित मान्यवर आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानातील मूल्ये आणि तत्त्वांप्रती आपली बांधिलकी
व्यक्त केली. त्यानंतर उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संविधानाच्या मराठी
व इंग्रजी आवृत्तीच्या पुस्तिकांचे वितरण करण्यात आले.
भारतीय संविधान
हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधार असून, नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये आणि
शासनव्यवस्थेची मूलभूत तत्त्वे संविधानात अधोरेखित करण्यात आली आहेत. संविधानातील विचार
आणि मूल्ये समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावीत, तसेच नागरिकांमध्ये संविधानाविषयी
जागरूकता निर्माण व्हावी, या दृष्टीने संविधान पुस्तिकांचे वितरण महत्त्वपूर्ण ठरणार
आहे.
या कार्यक्रमास
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आमदार
राजेश मोरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त
अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, ठाणे महानगरपालिका आयुक्त
सौरभ राव, जिल्हा परिषद, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अंबरनाथ नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासह संबंधित महानगरपालिका व नगरपरिषदांचे अधिकारी
उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त
आयोजित या उपक्रमातून संविधानातील लोकशाही मूल्यांचा प्रसार आणि नागरिकांमध्ये संविधानाबाबत
जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
00000000000


Comments
Post a Comment