महाराष्ट्र शासनाची सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (रब्बी हंगाम २०२६-२७) जाहीर; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

 


ठाणे,दि.3(जिमाका) :- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उत्पादन आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या एका वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असणार आहे.

रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सात अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. या योजनेसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) पोर्टल आधीच कार्यान्वित करण्यात आले आहे.

नोंदणीच्या अंतिम मुदती

·         रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत): ३० नोव्हेंबर २०२६

·         गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांदा: १५ डिसेंबर २०२६

·         उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग: ३१ मार्च २०२७

कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. जर एखाद्या कर्जदार शेतकऱ्याला या योजनेत सहभागी हो ण्यास नसेल, तर नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर त्याने तसे बँकेस लेखी कळवणे आवश्यक आहे.

नोंदणी कुठे आणि कशी करावी?

शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ pmfby.gov.in या पोर्टलवर जाऊन स्वतः, किंवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप आणि सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून आपल्या सहभागाची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा निहाय नियुक्त विमा कंपन्या

·         समूह १, ५, ६, ९ (अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती व गडचिरोली): इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

·         समूह २, ३, ४, ८ (सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, हिंगोली, अकोला, धुळे व पुणे): एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

·         समूह ७ (वाशिम, बुलडाणा, सांगली व नंदुरबार): बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

·         समूह १० (धाराशिव): भारतीय कृषि विमा कंपनी (AIC)

·         समूह ११ व १२ (लातूर व बीड): एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

यंदाच्या वर्षात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून आपल्या पिकाचा विमा सुरक्षित करावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या वतीने संचालक (कृषी विस्तार व प्रशिक्षण) सुभाष काटकर यांनी केले आहे.

0000000000

 

Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती